मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) तालुक्यातील विवरा येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणात दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पंधरा दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप आरोपीस ताब्यात घेतले नसल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सविस्तर माहिती अशी की, ११ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता मुलीचे वडील सोलर प्लांटमध्ये ड्युटीवर होते. दरम्यान, रात्री साडेअकरा वाजता अतुल नारखेडे यांनी त्यांना फोन करून माहिती दिली की, त्यांची मुलगी गावातील आशिष उर्फ हर्षल सोपान भोगे याच्या मोटारसायकलवर बसून निघून गेली आहे. वडिलांनी तात्काळ घरी धाव घेतली. विचारपूस केली असता, मुलगी शेजारी झोपायला गेली असल्याचे पत्नीने सांगितले. मात्र, शोध घेतल्यावर ती तेथेही आढळली नाही. गावातील विनोद सरोदे व राहुल नारखेडे यांनीही मुलगी आणि हर्षल भोगे यांना दसरखेडच्या दिशेने जाताना पाहिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, मुलीने जाताना घरातील डाळीच्या डब्यात ठेवलेले पैसेही सोबत नेल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणात तोंडी फिर्यादीवरून आशिष उर्फ हर्षल सोपान भोगे (रा. विवरा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन आठवडे उलटूनही न मुलीचा ठावठिकाणा लागला आहे, ना आरोपीला अटक करण्यात आले आहे, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.