हिवराआश्रम :- हिवरा आश्रमहून चिखलीला जात असताना शिवाजीनगर फाट्यावर ट्रॅक्टरच्या निष्काळजी वळणामुळे दोन इनोव्हा गाड्या एकमेकांवर धडकल्या. या भीषण अपघातात चिखली येथील राजघराणा कापड दुकानाचे संचालक व प्रतिष्ठित व्यापारी विष्णू हरिभाऊ पडघान (वय ८०) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी पडघान यांना मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर आज ३१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता चिखली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विष्णू पडघान हे अमरावती शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य होते. त्यांच्या निधनाने पडघान कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.