( वृतसंस्था ) कर्नाटक ) बेळगाव : – रिक्षाला गाडी घासून गेल्यामुळे संतापलेल्या एका रिक्षा चालकाने बेदम मारहाण केल्यामुळे गोव्यातील माजी आमदार लहू मामलेदार (६९) यांचा बेळगावात मृत्यू झाला. रिक्षाला गाडीचा जरासा धक्का लागल्यामुळे मामलेदार यांनी सॉरी म्हटल्यावरही या रिक्षा चालकाने पाठलाग करून त्यांची गाडी अडवली आणि त्यांना मारहाण केली. त्यानंतर लॉजच्या पायऱ्या चढताना खाली कोसळलेल्या मामलेदार यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. मामलेदार यांनी २०१२ मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत फोंडा मतदारसंघातून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामलेदार हे कामानिमित्त बेळगावला आले होते. यावेळी दुपारी दीडच्या सुमारास राहुल नावाच्या व्यक्तीशी आणि एका रिक्षा चालकाशी त्यांचे रिक्षाला धक्का लागल्यावरून कडाक्याचे भांडण झाले. या वादात रिक्षा चालकाने त्यांच्या कानाखालीही लगावली. दोघांमध्ये मारहाण सुरू असल्याचे दिसताच लॉजच्या कर्मचाऱ्यांनी आणि इतर लोकांनी त्यांचा वाद मिटवला. मात्र याचवेळी लॉजच्या पायऱ्या चढून जाताना त्यांचा पाय घसरला आणि ते जोरात पडले. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
धक्कादायक घटना; ‘सॉरी’ म्हणून पुढे गेल्यानंतर रिक्षा चालकाने केला पाठलाग; रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू!
