मेहकर : अवैध सावकारी व्यवहारातून जमीन बळकावल्याप्रकरणी मेहकर पोलिसांनी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. मुददल व व्याजाची रक्कम परत करूनही शेतजमीन न परत करता ती पुढे खरेदीखताद्वारे विकल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ही घटना तालुक्यातील मोळा शिवारात १३ डिसेंबर २०१३ ते १७ जुलै २०२५ दरम्यान घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, अर्जदाराने २०१३ मध्ये जगदीश घिसाराम सामोता (रा. संताजी नगर, मेहकर) यांच्याकडून व्याजावर ४ लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात अर्जदाराच्या मालकीची मोळा शिवारातील ०.७१ आर शेतजमिनीचा खरेदीखत (क्र. ३४६३/२०१३) करण्यात आला. मात्र मुददल व व्याजाची पूर्ण परतफेड करूनही सामोता यांनी जमीन परत केली नाही. उलट त्यांनी ती जमीन २०१७ मध्ये विजय भिमराव आव्हाळे (रा. वैदीका मेडीकल, मेहकर) यांना विकली. पुढे आव्हाळे यांनी तीच जमीन काशीराम कुडलीक ठाकरे (रा. अकोला) यांना विकली. त्यानंतर ठाकरे यांनी २०१९ मध्ये रेखा रामेश्वर पिटकर (रा. रामनगर, मेहकर) यांना विक्री केली. या प्रकरणाची चौकशी संजय उत्तम पाचरणे यांच्या अर्जावरून करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालय, बुलडाणा यांनी १७ जुलै २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार सदर सर्व खरेदीखत नाममात्र असून अवैध सावकारी व्यवहारातून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. शासनाच्या आदेशानुसार अर्जदारास जमीन परत देण्याचे ठरले असले तरी ती परत न मिळाल्याने दिलीप भिकाजी बोडे (रा. मेहकर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी जगदीश घिसाराम सामोता, विजय भिमराव आव्हाळे, काशीराम कुडलीक ठाकरे आणि रेखा रामेश्वर पिटकर यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.