खामगाव : – खामगाव एसटी बसस्थानकावर एका ज्येष्ठ प्रवाशाच्या खिशातून ४७ हजार रुपयांची रोकड असलेले पाकीट चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याजवळून ४५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
ही घटना ४ एप्रिल रोजी दुपारी घडली. मोताळा तालुक्यातील जयपूर कोथळी येथील ८२ वर्षीय वासुदेव दत्तात्रय कुलकर्णी हे खामगाव बसस्थानकावरून आपल्या गावी परतण्यासाठी एसटीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले. या पाकिटात ४७ हजारांची रोकड होती. काही वेळानंतर चोरी लक्षात येताच त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी हमीदखान इसाखान (७२, रा. नांदुरा) याला शोधून काढण्यात आले. तो परिसरात फिरताना पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून, त्याच्याकडून ४५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.