बुलढाणा : बुलढाणा-मलकापूर मार्गावरील वाघजाळ फाट्याजवळ सोमवारी (११ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एक संशयास्पद एरिटीका कार थांबविली. तपास केला असता कारमध्ये सुमारे एक कोटी रुपयांची रोख रक्कम पोत्यामध्ये भरून वाहून नेली जात असल्याचे आढळले. पोलिसांनी संशयावरून सखोल चौकशी केल्यावर, ही रक्कम बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची असल्याचे स्पष्ट झाले.
सदर रक्कम बँकेच्या अधिकृत कागदपत्रांसह वाहून नेली जात असल्याचे शाखा अधिकारी सहदेव डाबेराव यांनी दाखविलेल्या कागदपत्रांमुळे स्पष्ट झाले. मुख्य शाखेतून जळगांव जामोद शाखेत व्यवहारासाठी रक्कम पाठविण्यात आली असल्याने पोलिसांनी तपासानंतर कार सोडली. या घटनाक्रमाने परिसरात खळबळ उडाली होती, परंतु रक्कम बँकेची अधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी प्रकरण बंद केले.