मलकापूर : – मलकापूर येथील मुक्ताईनगर मार्गावर रात्री झालेल्या अपघातात सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेख गफ्फार शेख रहीम (वय ५५, रा. मलकापूर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते जीएस गोल्ड कंपनीत वॉचमन म्हणून कार्यरत होते. शुक्रवार, ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास ते ड्युटीवरून सायकलने घरी जात असताना, समोरून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने (क्रमांक : एमएच २८ बीजे ३०२३) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शेख गफ्फार गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातात दुचाकीस्वार प्रेम सचिन निमकर (वय २३, रा. वरणगाव) देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.