मलकापूर : श्री भगवान महावीर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, त्यामध्ये येथील समाजसेवक, नगरसेवक सुहास (बंडू) चवरे व डॉ. योगेश पटणी यांचा समावेश आहे. भगवान महावीर स्वामींच्या २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक ७ ऑगस्ट रोजी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा ईत्यादीच्या आयोजनासाठी तसेच कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने राज्यस्तरीय समितीच्या दिशानिर्देशानुसार बुलडाणा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन व त्या संबंधित विविध शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, शाळा व्यवस्थापन, जैन संघ यांच्याशी समन्वय करून कार्य पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली. या समितीत विजय बाफना, समीर संचेती, आशिष बयानी, डॉ. योगेश पाटणी, मयूर गोलेचा सुहास चवरे, तेजस भंडारी, नीता जैन आदींचा समावेश आहे. भगवान महावीर स्वामींच्या २५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित करावयाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा यांच्या जिल्हास्तरावर आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीच्या दिशानिर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे, त्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, आयुक्त महानगरपालिका, मुख्याधिकारी नगर पालिका, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन, जैन संघ यांच्याशी समन्वय करून कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे. तालुका, जिल्हास्तरावर निबंध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यासाठी आवश्यक समन्वय करून अंमलबजावणी करणे असे समितीचे कार्य राहणार आहे.