महाराष्ट्र मॅटराइज सर्व्हे : महाराष्ट्राच्या 288 विधानसभा जागांसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होणार असून, निकाल 23 नोव्हेंबरला लागतील. त्याआधीच, मॅटराइज सर्व्हेने राज्यात कोणाचे राज्य असणार याचे अंदाज वर्तवले आहेत. या सर्व्हेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले असून, महाविकास आघाडी आणि महायुती यांचे धाबे दणाणले आहेत.
सर्व्हे 10 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आला असून, राज्यातील 1,09,628 नागरिकांच्या मतांचा आधार घेऊन हा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये 57,000 हून अधिक पुरुष, 28,000 महिला आणि 24,000 तरुण मतदारांचा सहभाग होता.
सर्व्हेचा निकाल: महायुतीला संपूर्ण बहुमताचे संकेत
सर्व्हेच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ‘महायुती’ आघाडीचा विजय होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.
सर्व्हेच्या निकालानुसार, महायुतीला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळण्याची शक्यता आहे.
मतांच्या टक्केवारीत महायुतीला आघाडी
सर्व्हेच्या मतांच्या टक्केवारीनुसार, महायुतीला 47% मते मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 41% मते मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. इतर पक्षांना 12% मतांचा वाटा मिळू शकतो, असे सर्व्हेने सुचवले आहे.
सर्व्हेच्या या निकालांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात ताप वाढण्याची शक्यता आहे. महायुतीसाठी ही सकारात्मक बातमी असली तरी, महाविकास आघाडीला त्यांचे मतदार साधण्याचा अंतिम प्रयत्न करावा लागणार आहे.
राजकीय लढाईतील पुढील टप्पे
आता मतदानाची तारीख जवळ आली असून, यापूर्वीच सर्व्हेच्या निकालांनी राजकीय पक्षांना आपापली रणनिती पुनरावलोकन करण्याची संधी दिली आहे. पुढील काही दिवस राज्यातील राजकारणात अधिक रंग भरू शकतात.
ही बातमी एका सर्वेनुसार देण्यात आली आहे. मात्र राज्यात सरकार कोणाचे येणार हे 23 नोव्हेंबर च्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.