Headlines

विधानसभा निवडणुकीत”किती रे दमछाक माझ्या पोलीस दादांची” नेत्यांच्या सभा आणि पोलीस दलाचे अपार योगदान: एका निष्ठावंत सेवेचा ठसा

 

मलकापूर( दिपक इटणारे ):- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पोलीस दलाने आपल्या समर्पणाने लोकशाही प्रक्रियेला यशस्वी बनवले. राजकीय नेत्यांच्या सभा आणि निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान मलकापूर शहरासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. बुलडाणा जिल्ह्यातील हे चित्र त्यांच्या निष्ठेची जिवंत साक्ष आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुलडाणा येथे सभा असो किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मलकापूर येथे सभा, या दोनही महत्त्वाच्या प्रसंगी जिल्ह्यातील पोलीस दलाने शिस्त आणि दक्षतेने बंदोबस्ताचे काम सांभाळले. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर केवळ दोन दिवसांत अमित शहा यांच्या सभेसाठी पोलिसांना मलकापूर येथे स्थलांतर करावे लागले. तीन दिवस मुक्कामी राहत, त्यांनी हा मोठा कार्यक्रम शांततेत पार पाडला.
नेत्यांच्या सभांमध्ये पोलीस दलाचे काम फक्त गर्दीचे नियोजन एवढ्यापुरते मर्यादित नसते, तर तिथे शिस्त राखणे, अनुचित प्रकारांना आळा घालणे, आणि नागरिकांचा विश्वास टिकवणे या साऱ्यांची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतात.
पोलीस दलाच्या या अविरत सेवेचा विचार करता, त्यांचे कौतुक करणे हे आपले नैतिक कर्तव्य ठरते. अनेकदा आपल्या कामाच्या ओझ्याखाली स्वतःचे आरोग्य आणि कुटुंबाचा वेळ ते बाजूला ठेवतात. तरीही कर्तव्याला प्राधान्य देत, ते नेहमीच सज्ज असतात. लोकशाही प्रक्रियेला शांततेत आणि व्यवस्थित पार पाडण्यात पोलीस दलाचा वाटा मोलाचा असतो. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि समर्पणाचा आपण आदर केला पाहिजे. “पोलीस दलाचे अथक प्रयत्न म्हणजेच लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!