दुसरबीड: ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता दुसरबीड येथील खडकपूर्णा नदीपात्रात लोखंडी ड्रममध्ये एक अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळले. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून त्याच्या हातावर “रघवीर” असे नाव लिहिलेले होते. मृतदेह पोत्यात बांधून ड्रममध्ये ठेवून नदीत टाकलेला आढळल्याने खुनाचा संशय आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून, हत्येचा गुन्हा दाखल केला. मृतकावर अज्ञात हत्याराने डोक्यावर हल्ला केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.प्रशासनाने मृतकाच्या ओळखीबाबत माहिती मिळविण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर व एलसीबी बुलडाणाचे अधिकारी उपस्थित होते. मृतदेह उत्तरीय शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालय, बुलडाण्याकडे पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अद्याप ओळख न झालेल्या इसमासंदर्भात माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.गुन्ह्याचा तपास ठाणेदार विनोद नरवाडे, जमादार गणेश डोईफोडे, आणि पोकॉ सुभाष गीते करत आहेत.