चिखली:- चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले यांचे अंगरक्षक यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 31 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई महाले यांचे अंगरक्षक म्हणून अजय शंकर गिरी हे होते. काही दिवसापूर्वीच त्यांची मुंबईतून बुलढाणा येथे बदली झाली होती. अजय गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते. आज त्यांची साप्ताहिक सुट्टी असल्याने ते कर्तव्यावर नव्हते. मात्र आज दुपारच्या सुमारास त्यांनी राहत्या घरीच स्वतःवर गोळी झाडली. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळाली त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात असलेले अंगरक्षक अजय गिरी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले,डॉक्टरांनी अजय गिरी यांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली,या घटनेमुळे बुलढाणा शहरात खळबळ उडाली आहे.अंगरक्षक अजय गिरी यांनी आत्महत्या का केली अद्याप समजू शकले नाही.