मलकापूर : मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरुद्ध सहकारी संचालक मंडळातील १६ संचालकांपैकी १४ संचालकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे आज २१ मे रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केल्याने राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे.
गतवर्षीच मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपा नेते चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने बाजार समितीची सत्ता एक हाती काबीज करीत सभापतीपदी शिवचंद्र तायडे विराजमान झालेत. मात्र एक वर्षाच्या कार्यकाळातच सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात सहकारी १४ संचालकांकडून अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. विद्यमान सभापती शिवचंद्र तायडे हे बाजार समितीचा कारभार व प्रशासन करीत असताना तसेच धोरणात्मक निर्णय घेतांना बाजार समितीच्या सदस्यांना विश्वासात घेत नाही. अधिनियमातील तरतुदीनुसार बाजार समितीच्या सभा घेऊन कामकाज करीत नाही असा ठपका या १४ संचालकांकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावावर ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषी उत्पन्न विपणन ( विकास व नियमन ) अधिनियम १९६३ चे कलम २३ नुसार बाजार समितीचे सभापती यांचे विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्याकरता समितीची विशेष सभा बोलवण्यासाठीची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. तसेच यापुढे शिवचंद्र तायडे यांचे बाजार समितीच्या सभापतीपदी राहणे बंद व्हावे व त्यांनी बाजार समितीच्या सभापती पदाचे अधिकाराचा कोणत्याही प्रकारे वापर करू नये असेही ही सभा ठरवते. सभेमध्ये बाजार समितीचे सभासद साहेबराव शालिग्राम पाटील हे सदर ठराव मांडतील. तरी सभापती शिवचंद्र तायडे यांचे विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी व त्यावर निर्णय घेण्यासाठी बाजार समितीची विशेष सभा बोलविण्यात यावी अशी मागणी सुद्धा या अविश्वास प्रस्तावाद्वारे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रस्तावावर यावेळी सर्वश्री संचालक साहेबराव पाटील, नागो राणे, संजय काजळे, भगवान चोपडे, विजय साठे, श्रीकृष्ण खापोटे, मधुकर फासे, ज्ञानदेव वाघोदे, सुनीलकुमार अग्रवाल, सौ नंदाबाई पाटील, सौ प्रीती नारखेडे, प्रवीण क्षिरसागर, सुभाष पाटील व कुंदन चांडक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामुळे राजकीय पटलावर चांगलीच खळबळ उडाली असून भाजपात उघड उघड दुफळी निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर निवडून आलेल्या संचालक मंडळात एकमेव प्रवीण क्षिरसागर हे काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते अर्थात ते विरुद्ध पक्षाचे संचालक असले तरी त्यांनी सुद्धा या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली असल्याचे दिसत आहे.
भाजपा नेते चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वात भाजपा समर्थित पॅनेलने निवडणूक जिंकत बाजार समितीची एक हाती सत्ता ताब्यात घेतली होती. त्यावेळी दरवर्षी नवीन सभापती निवड प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. २० तारखेला एक वर्ष पूर्ण झाले तरी शिवचंद्र तायडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही त्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.