मलकापूर : एका किरकोळ वादाने विक्राळ रूप धारण करत शहरातील गोकुलधाम परिसरात मंगळवारी सकाळी चाकू हल्ल्याची थरारक घटना घडली. संतापाच्या भरात २९ वर्षीय युवकाने एका २५ वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला करत तिच्या मानेवर चाकूने वार केले आणि त्यानंतर स्वतःच्या मानेवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, दोघेही सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की जान्हवी रवींद्र साळी (वय २५) ही गोकुलधाम परिसरातील घरासमोर उभी असताना शुभम विलास झनके (वय २९, रा. यशोधाम परिसर) याच्याशी काही कारणावरून वाद झाला. शाब्दिक चकमक तीव्र होत गेली आणि संतापाच्या भरात शुभमने जवळ असलेल्या धारदार चाकूने जान्हवीच्या मानेवर वार केला. तिच्या आरडाओरडीनंतर धाकटी बहीण रोशनी बाहेर आली, तसेच शेजाऱ्यांनी धाव घेत तत्काळ जखमीला रुग्णालयात हलविले. दरम्यान, हल्ल्यानंतर शुभमनेही स्वतःच्या मानेवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश महल्ले व सहायक पोलिस निरीक्षक गजानन कौळसे यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या नातेवाइकांशी संवाद साधला. दोघांची प्रकृती सध्या स्थिर असून, धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रोशनी रवींद्र साळी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी आरोपी शुभम विलास झनके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०९ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय गजानन कौळसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.