मलकापूर:- मलकापूर (प्रतिनिधी) : मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाजपचे शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज दिनांक ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभे पूर्वीच कार्यकर्त्यांचा प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. दरम्यान दोन्ही गट समोरासमोर आल्याने प्रचंड नारेबाजी करण्यात आली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला पोलीस लाठीचार करत असतांना जमावकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांवर दगडफेक करण्याचा व्हिडीओ सोशिअल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये बी.एस.एन.ल टॉवर बाजूला असलेल्या गल्लीत जमाव शिरला होता. त्याला पांगवण्यासाठी पोलीस त्यांच्या मागे धावत होते. त्या जमावकडून पोलिसांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेक सुरू होताच पोलीस घटनास्थळावरून जीव वाचवण्यासाठी पलायन करतांना दिसत आहे. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे . परंतु जमावापैकी कोणावरही अद्याप गुन्हा दाखल झाल्याचे अधिकृत वृत्त नाही.