Headlines

अँटी-रॅगिंग मोहिमेत कोलते महाविद्यालयाचे विद्यार्थी देशपातळीवर

मलकापूर – शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या अँटी-रॅगिंग मोहिमेत मलकापूर येथील पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. या उपक्रमात देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी दहा विविध आकर्षक आणि सृजनशील क्रियाकलापांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात पोस्टर डिझाइनिंग, रिल्स निर्मिती, यूट्यूब व्हिडिओ, सेल्फी पॉईंट आणि अशाच अन्य उपक्रमांचा समावेश होता.

या उपक्रमात कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातील 70 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, यापैकी दोन विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडले गेले आहेत. तिसऱ्या वर्षातील इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थी संकेत सावळे आणि शेवटच्या वर्षातील सिव्हिल शाखेतील विद्यार्थिनी श्रेया जाधव यांची अंतिम निवड झाली आहे. या विद्यार्थींच्या यशामुळे महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले गेले आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी संकेत सावळे आणि श्रेया जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, डॉ. मोईज हुसेन, इलेक्ट्रिकल शाखेचे विभाग प्रमुख प्रा. योगेश सुशीर, प्रा. निलेश बुडूखले, प्रा. निलेश बुंदे सह प्राध्यपिका तेजल खर्चे, प्रा. संगीता खर्चे आदी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, त्यांना भविष्यामध्ये आणखी मोठी शिखरे गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयातील अँटी-रॅगिंग सेलच्या इंचार्ज प्राध्यापिका तेजल खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. त्यांच्या अथक परिश्रम व प्रेरणेमुळे महाराष्ट्रातून या दोनच विद्यार्थ्यांची अंतिम फेरीत निवड होऊ शकली. प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी प्राध्यापिका तेजल खर्चे यांचेही विशेष कौतुक केले आणि भविष्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना असेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्याची प्रेरणा दिली. या यशामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शिक्षक, कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांच्या यशाचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!