बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर व ग्रामीण भागात १३ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा पुर ओढवला. नळगंगा धरणातील पाण्याचा मोठा विसर्ग झाल्याने दाताळा आणि मलकापूर गावांत पाण्याचा शिरकाव झाला, ज्यामुळे अनेक कुटुंबांचे अन्न-धान्य वाहून गेले. या परिस्थितीत अनेक कुटुंबं अडचणीत सापडले आहेत. बरेच कुटुंबाचा दाताळा गावातील शाळेत तात्पुरता निवारा करण्यात आला आहे.
या आपत्तीत नुकसान झालेल्या मदत देण्यासाठी मलकापूर येथील कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था या NGO ने मदतीचा हात पुढे करण्याचे ठरविले त्यानुषगाने संस्थेने विविध दात्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले, मलकापूर व दाताळा येथील नुकसानग्रस्त कुटुंबाची संख्या २००० पेक्षा जास्त होती परंतु यापैकी अॅमेझॉन आणि डोनेटकार्टने ५०० राशन कीट पुरवण्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे पुरग्रस्तांना आवश्यक अन्नधान्य आणि किराणा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या प्रतिनिधींनी तहसील कार्यालय मलकापूर येथे भेट देऊन मदतकार्याबाबत चर्चा केली. तहसीलदारांनी प्राथमिकता दाताळा गावातील पुरबाधितांना मदत देण्याच्या निर्देश दिले. यासाठी संस्थेच्या अध्यक्ष श्री. दिलीपभाऊ नाफडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमितकुमार नाफडे, प्रकल्प संचालक आशिष जी नाफडे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे प्रमुख श्री. रवि जी पाटील असून, अन्य सदस्यांमध्ये श्री. प्रवीण बेलोकार, श्री. सुमित बोराखडे, श्री. प्रदुन्य कोल्हे, श्री. विशाल धांडे,महेश शिंदे, रोशन देशमुख आणि श्री. योगेश पाटील यांचा समावेश आहे.
दिनांक २२ आणि २३ ऑक्टोबर २०२४ रोजी संताजी नगर, बोदवड रोड येथील कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयातून दाताळा येथील ५०० पुरग्रस्त कुटुंबांना राशन कीटचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी गरीब कुटुंबांच्या वेदना पाहून त्यांच्या नुकसानीचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. तरीही हि दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला मिळालेली ही मदत गरीब कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. या उपक्रमात तहसील कार्यालय, ग्रामसेवक, पोलीस पाटील, स्थानिक पत्रकार, मलकापूर पोलीस, तसेच इतरांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यामुळे संस्थेच्या निस्वार्थ सेवाभावाचे दर्शन झाले असून, यामुळे इतर संस्थांना सुद्धा अशा प्रकारच्या मदतकार्यांसाठी प्रेरणा मिळेल.