( संदीप गावंडे )नांदुरा :
महिला शेतमजुरांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या उभ्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्यामुळे दोन महिला शेतमजूर जागीच ठार तर 13 महिला जखमी झाल्याची घटना सकाळी 5.45 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील वडी येथे घडली.
याबाबत सविस्तर असे की सध्या सोयाबीन काढणी, मका सोंगनी तसेच कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. शेतमजूर मोठ्या सकाळीच आपल्या कामावर जात असतात. नायगाव येथे कामावर जाण्यासाठी वडी येथील महिला शेतमजुरांना घेऊन जाण्यासाठी नायगाव येथील ट्रॅक्टर क्रमांक MH 28AZ 7017 सकाळीच वडी येथे आले होते. दरम्यान आपल्या घरचा स्वयंपाक करून आपली शिदोरी सोबत घेऊन वडी येथील महिला शेतमजूर ट्रॉलीमध्ये चढत असताना भल्या पहाटे सकाळी 5.45 च्या दरम्यान नांदुरा कडून मलकापूर कडे जाणाऱ्या एका अज्ञात ट्रकने ह्या शेतमजुरांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून जबर धडक दिली. धडक एवढी जबर होती की दोन महिला जागीच ठार झाल्या तर इतर महिला गंभीर जखमी झाल्या. अपघाताचा मोठा आवाज ऐकून शेजारच्या वस्तीमधील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सर्वांनी जखमींना दवाखान्यात हलविण्याचे कार्य केले. तोपर्यंत गावातील इतर मंडळीही महामार्गावर गोळा झाली. अपघाताची बातमी पंचक्रोशीतील गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. तात्काळ सर्व गावकऱ्यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत महामार्गावर रास्ता रोको केला.
मृतकांच्या नातेवाईकांना तात्काळ भरीव आर्थिक मदत देण्यात यावी तसेच अपघातात जखमींचा संपूर्ण इलाजाचा खर्च महामार्ग प्राधिकरणाने करावा,वडी येथे महामार्गावर अंडरपास करून सर्विस रोडची व्यवस्था करावी अशा च्या मागण्या यावेळी संतप्त जमावा तर्फे करण्यात आल्या. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक सुरू होणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
आघाडीचे उमेदवार राजेश एकडे, युतीचे उमेदवार चैनसुख संचेती, बाजार समिती सभापती भगवान धांडे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर डामरे,
भाजपाचे ज्ञानेश्वर ढोले,
शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष डिवरे, तालुकाप्रमुख सुनील जुनारे यांच्यासह विविध राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी अपघाताच्या ठिकाणी उपस्थित होत ग्रामस्थांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील तथा इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी ए एस खान यांनी देखील घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे यांच्याशी फोनवरून संभाषण करून त्यांनी दहा तारखेपासून वडी येथे अंडरपास तसेच सर्विस रोडचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील एका बाजूची वाहतूक ग्रामस्थांनी सुरू करण्यास परवानगी दिली.
चौकट 1..
मृतक महिला..
1. सरिता दत्तात्रय भोकरे
2. शारदा विजय तायडे
चौकट दोन
जखमी महिला
1. चंदा विनोद तायडे
2. स्वाती प्रवीण इंगळे
3. शांताबाई शेगोकार
4. निर्मलाबाई ब्राह्मणे
5. मनीषाबाई गोंड
6. गंगुबाई रुमाले
7. चंद्रकलाबाई येतो कार
8. गायत्रीबाई डोंब
9. वछलाबाई वाघ
10. कांताबाई वाघ
11. सिंधुबाई बोंडे
12. गिताबाई गव्हाणे
चौकट..3
दिवाळी सारखा सण असूनही धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास जर ह्या शेतमजूर महिला आपल्या मुलाबाळांना सोडून शेतात कामाला जात असतील तर त्यांची घरची आर्थिक परिस्थिती ही कशी आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मृतक महिला भगिनी तसेच जखमी महिलांना तात्काळ आर्थिक मदत मिळणे जरुरी आहे.