( वृतसंस्था )अकोला : पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर असलेले पोलिस अंमलदार गणेश पाटील (रा. खडकी) यांनी खदान पोलिस ठाण्यात त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलाचे नरबळीच्या उद्देशाने अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र असे काही झालेच नसल्याची बाब समोर आल्या नंतर वाद झाला. यावेळी गणेश पाटील यांनी खदान पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या ड्युटी ऑफीसरला जातीवाचक अश्लिल शिवीगाळ केल्याने त्यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे व अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. खदान पोलिस ठाण्यात पोहेकॉ. सुनिल दशरथ दाभाडे हे डे ऑफिसर असताना ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता गणेश रामराव पाटील हा पोलिस ठाण्यात आला व माझ्या ९ वर्षीय मुलाचे नरबळीच्या उद्देशाने अपहरण झाले आहे, अशी माहिती त्याने दिली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करुन पोलिसांनी गणेश पाटील याची पत्नी, आई व मुलाची विचारपूस केली. त्यावर त्यांनी सांगितले की, गणेश पाटील रात्री दारु पिऊन आले व नाहक त्रास देऊन शिवीगाळ केली व जीवाने मारण्याची धमकी देत होता. रागाच्या भरात काही करेल म्हणून अर्पाटमेंटच्या बाजूला आम्ही लपून बसलो. त्यानंतर संध्याकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान पोहेकॉ. सुनील दाभाडे यांनी पोलिस निरीक्षकांसमोर गणेश पाटील, त्याची आई, पत्नी व मुलाला हजर केले असता मुलाचे कुणीही अपहरण केले नसल्याची बाब समोर आली. याचवेळी त्याच्याविरुद्ध त्याची आई तक्रार करत असताना माझी तक्रार नोंदवून न घेता आईची तक्रार घेत असल्याने त्याने पोहेकॉ. दाभाडे यांना अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.