मलकापूर :- स्थानिक हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज दि. 28/07/2024 रोजी शिक्षण सप्ताह उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत प्रत्येक दिवस हा विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला होता. या सप्ताह दरम्यान शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले अध्ययन अध्यापन साहित्य दिनानिमित्त मुखवटे तयार करण्यात आले .चित्रावरून गोष्टी विद्यार्थिनींनी सांगितल्या . पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिनानिमित्त गणित तज्ञांच्या गोष्टींचा संग्रह , गणितीय खेळ खेळण्यात आले. विद्यार्थिनी शारीरिक मानसिक सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त व्हाव्यात या अनुषंगाने क्रीडा दिन साजरा करण्यात आला. स्वदेशी खेळांची माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली. शाळेचे वातावरण चैतन्यमय व आनंददायक बनविण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. स्त्री-पुरुष समानता, झाडे लावा झाडे जगवा या विषयांवर आधारित एकांकिका सादर करण्यात आल्या.आवड, छंद आणि करिअर यांची सांगड कशी घालावी याचे मार्गदर्शन कौशल्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. विद्यार्थिनींनी पाकीट निर्मिती ,पिशवी निर्मिती, माती काम , बांबूस्टिक काम , फ्लेमलेस कुकिंग ,यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. इको क्लब उपक्रमा अंतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांना आईच्या व मुलीच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या. एक पेड माँ के नाम हा उपक्रम राबविला गेला. दिनांक 28 रोजी समुदाय सहभाग दिवस कार्यक्रम घेण्यात आला. मलकापूर शिक्षण समितीचे संचालक श्री. कमलकिशोरजी टावरी यांनी अध्यक्षस्थान भूषविले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.शाळेच्या प्राचार्या सौ. ममताताई पांडे यांनी अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टिकोन व विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या उपक्रमांची आवश्यकता आहे असे प्रस्ताविक व परिचयात सांगितले. पर्यवेक्षिका सौ खडसे मॅडम यांनी विद्यांजली पोर्टल ची माहिती देताना सांगितले की शाळांमध्ये सामुदायिक आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाद्वारे शाळांना बळकट करण्याच्या उद्देशाने घेतलेला पुढाकार म्हणजे विद्यांजली. शाळा व समाज यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे हा विद्यांजली पोर्टलचा उद्देश आहे.
समापन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पोळ यांनी केले, आभार प्रदर्शन श्री डहाके यांनी केले, कार्यक्रमाची सांगता कु. स्वप्ना जोशी यांनी एकात्मता मंत्राने केली.
तिथी भोजनाचे आयोजन पोषण आहार अंतर्गत करण्यात आले. सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक हे उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.