मेहकरः बनावट नोटांद्वारे मेहकरध्ये दारू खरेदी करण्यात आल्याचा प्रकार २५ जुलै रोजी उघड झाला असून या प्रकरणी पोलिसांनी डोणगावातील दोन व वाशिम जिल्ह्यातील एक अशा तिघांविरोधात बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सोहम सखाराम खेत्रे (रा. पिंप्री सरहद, जि. वाशिम), जगदिश अशोक पांडव आणि गजानन लक्ष्मण मुळे (रा. डोणगाव, ता मेहकर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात बीएनएस कायद्याच्या कलम १७९, १८०, ३ (५) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहकरातील वाईन शॉपसमोर हा प्रकार घडला. २५ जुलै रोजी उपरोक्त तिघांनी एका दुकानातून ५०० रुपयांच्या दहा बनावट नोटाद्वारे दारू घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील व्यक्तीला संशय आल्याने शहानिशा केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघड झाला. प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल समाधान हरिभाऊ आरमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला.