साखरखेर्डा : येथील पोलिस ठाण्यापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गुंजमाथा शिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह २४ जुलै रोजी आढळून आला. अडचणीच्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. साखरखेर्डा मंडळात गुंज माथा हे उजाड गाव असून, या शिवारात सवडद, साखरखेर्डा, गुंज येथील शेतकऱ्यांची शेती आहे. साखरखेर्डा ते जानेफळ असा इंग्रजकालीन डाक रस्ता आहे. या रस्त्यावर सवडद येथील राजू अंभोरे यांची शेती आहे. त्याच्या जवळूनच एक नाला जातो. त्या नाल्यात सुमारे ६० वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह राज अंभोरे यांना आढळून आला. त्यांनी तत्काळ माहिती माजी सरपंच यांना दिली. त्यानंतर साखरखेड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्यासह कर्मचारी त्यानंत घटनास्थळी दाखल झाले. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेल् नाही. तिचा मृत्यू कशामुळे झाला हेही अद्याप समोर आले नाही. दरम्यान, हा घातपाताचा प्रकार तर नसावा न अशीही चर्चा आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेड राजा येथे पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर महिलेच्य मृत्यूचे कारण समोर येऊ शकते, असे ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी सांगितले.