खामगाव: मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींचा त्रास असह्य झाल्याने खेर्डी येथील २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरोधात हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.कीर्ती परशुराम काळे या विवाहितेने १३ जुलै रोजी दुपारी आत्महत्या केली. मृतक विवाहितेचे वडील नामदेव शंकर बदरखे (रा. चतारी, जि. अकोला) यांनी १४ जुलै रोजी हिवरखेड पोलिसात तक्रार दिली. आपल्या मुलीला मुलगी झाल्याने सासरच्या मंडळीने छळ केला. पती परशुराम काळे, सासरे शालीग्राम काळे, दीर चेतन काळे, नणंद रुख्मा बाठे (पहुरजीरा), पुष्पा राऊत (आंबेटाकळी) आणि स्वाती वानखडे (देऊळगाव) यांनी संगनमत करून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत केला. घर बांधकामासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावल्यानेच मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले.
सासरच्या मंडळींचा त्रास असह्य झाला,मुलगी झाली म्हणून आत्महत्येस केले प्रवृत्त! सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
