नांदुरा :- घरकुलाचा प्रस्ताव पाठवण्यासाठी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या नांदुरा पंचायत समिती मधील लोकसेवक खेमराज राठोड याला लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. ही कारवाई बांधकाम विभाग पंचायत समिती नांदुरा या ठिकाणी करण्यात आली आहे. याबाबत हकीकत अशा प्रकारे आहे कि यातील तक्रारदार (वय ३० वर्षे) यांचे व त्यांच्या आईचे घरकुलाचे प्रस्ताव पंचायत समीती नांदुरा येथे सादर केलेले होते. तक्रारदार हे त्यांच्या आईच्या घरकुलासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची चौकशी करण्याकरीता पंचायत समीती नांदुरा येथे गेले असता यातील लोकसेवक खेमराज राठोड, स्थापत्य अभियांत्रीकी सहायक, बांधकाम विभाग, पंचायत समीती नांदुरा हे तक्रारदार यांच्या घरकुलाचा प्रस्ताव पाठविल्याचा मोबदला म्हणुन २०००/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा घटकाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार काल दिनांक १५ जुलै रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली असता, लोकसेवक खेमराज राठोड यांनी तक्रारदार यांचेकडे २०००/- रुपये लाच मागणी करुन सदर लाच रक्कम स्विकारण्यास संमती दिली. त्यावरुन आज दिनांक १६ जुलै रोजी आयोजीत सापळा कार्यवाही दरम्यान लोकसेवक राठोड यांना तक्रारदार यांचेकडुन लाच रक्कम स्विकारतांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. त्यावरुन आरोपी राठोड यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. ही कारवाही मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती, अनिल पवार, अपर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, सापळा मदत पथक सफौ शाम भांगे, पोहेका प्रविण बैरागी, पोना विनोद लोखंडे, पोकॉ रंजीत व्यवहारे, चानापोकॉ नितीन शेटे, शेख अर्शीद अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी पार पाडली. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा यांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी केले आहे.