मलकापूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील चैन, पर्स किंवा पोत हिसकावण्याच्या घटना सतत वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘चोरांचा हात इतका लांब की पोलिसांनाही चकवा’ अशी नागरिकांत कुजबूज सुरू असतानाच, आज दि. ४ डिसेंबर रोजी रात्री 8.15 वाजता आणखी एक गंभीर घटना तुलसी ज्वेलर्स मार्गावर घडली.
आयडिबीआय बँक समोरून जाणाऱ्या एका महिलेला अज्ञात दुचाकीस्वाराने झडप घालत तिच्या गळ्यातील पोत हिसकावून घेतले आणि क्षणात दुचाकीवरून पसार झाला. अचानक घडलेल्या प्रकाराने घाबरलेली महिला जोरात आरडा-ओरडा करू लागली. स्थानिक नागरिक तत्काळ धावत आले, मात्र तोपर्यंत चोरटा नजरेआड झाला होता. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी महाजन, पोलिस निरीक्षक गणेश गिरी आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांनी पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
