Headlines

मलकापुरात बोगस मतदान! मलकापूरातील बोगस मतदान प्रकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह? प्रशासकीय व पोलिस यंत्रणेची ढिलाई उघडपणे समोर; केंद्रप्रमुखावर कारवाईची मागणी जोरात

मलकापूर ( दिपक इटणारे ) :- महाराष्ट्रभर काल झालेल्या 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायत निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी बोगस मतदानाच्या तक्रारींनी निवडणूक यंत्रणेची विश्वसनीयता धोक्यात आणली आहे. बुलढाणा, मुक्ताईनगरसह अनेक भागांत असे प्रकार उघड होत असताना “मलकापूर सुद्धा यापासून सुटलेले नाही” असे स्पष्टपणे दिसून आले आहे.

मलकापूर प्रभाग क्रमांक 15 मधील आत्मानंद जैन प्रायमरी स्कूल बूथ क्रमांक 4 येथे तुळसाबाई रामचंद्र पठ्ठे यांच्या नावावर अज्ञात व्यक्तीने बोगस मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. प्रत्यक्ष त्या महिला मतदानासाठी आल्यावरच तिला कळाले की तिच्या नावावर आधीच मतदान झाले आहे. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त, निवडणुकीसाठी उभारलेली संपूर्ण यंत्रणा असतानाही बोगस मतदान सर्रास कसे घडले? हा सर्वात मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. घाबरलेल्या प्रशासनाने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तिला बूथमध्ये बसवून ठेवले आणि नंतर तिचे मतदान पॅलेट पेपरद्वारे घेतले. मात्र या प्रकाराने उलट प्रशासनातील निष्काळजीपणा ठळकपणे समोर आला आहे.
लोकशाहीच्या अत्यंत पवित्र प्रक्रियेत असा भंग झाला, तर प्रशासनाने स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढत बसू नये. त्यातच, या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे त्या मतदान केंद्राच्या केंद्रप्रमुखाने आपली जबाबदारी नेमकी कशी पार पाडली?
बूथवरील संपूर्ण प्रक्रिया पाहणे, मतदार यादीची काळजीपूर्वक पडताळणी करणे आणि अशा प्रकारांना आळा घालणे ही सर्वात महत्वाची जबाबदारी केंद्रप्रमुखावर असते. त्याच बूथवर बोगस मतदान होणे म्हणजे प्रशासनाची गंभीर चूक. म्हणूनच या प्रकरणात स्थानिक नागरिकांमध्ये केंद्रप्रमुखावर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. कारवाई होणे केवळ एका अधिकाऱ्याला शिक्षा देणे नाही, तर भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी एक ठोस संदेश देणे अत्यावश्यक आहे.
राज्यभर बोगस मतदानाचे प्रकार उघड होत असताना मलकापूर सुद्धा त्याला अपवाद राहिलेले नाही, हे अत्यंत चिंताजनक आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि नागरिकांच्या मताचा सन्मान यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करणे हीच काळाची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!