Headlines

सहा दिवसांपासून कचरा गाडी बंद, शहर दुर्गंधी, डास आणि रोगराईच्या विळख्यात; प्रशासन ठप्प, लोकप्रतिनिधी बेपत्ता!

 

मलकापूर :- शहरात गेल्या सहा दिवसांपासून कचरा गाडी बंद असल्याने शहर अक्षरशः कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबले आहे. मुख्य रस्ते, गल्ल्या, बाजारपेठ, सर्वत्र उघड्यावर कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले असून तीव्र दुर्गंधी व डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप उसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कचरा गाडीवर काम करणाऱ्या मजुरांचे वेतन अनेक दिवसांपासून थकवण्यात आले होते. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मजूर संपावर गेले आणि शहरातील कचरा व्यवस्थापन पूर्णपणे ठप्प झाले. परिणामी शहरात डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांचा धोका नागरिकांवर घोंगावत आहे.
पालिकेचे प्रशासन मौनव्रत धारण करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीत आश्वासने देतात. मात्र अडचणीच्या वेळी गायब होतात, अशी तीव्र नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील मूलभूत सेवा पूर्णपणे ढासळल्या असताना नागरिकांचा प्रश्न आहे कचरा ढिगाऱ्याखाली दबलेल्या शहराला न्याय कोण देणार? ही समस्या तातडीने सोडवावी वेतन थकबाकी दूर करून कचरा व्यवस्थापन सुरळीत करावे, अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!