नगरपालिका निवडणुकीत युवा तरुणांची लाट; ९ वर्षांनंतरच्या निवडणुकीत युवा उमेदवारांचा उत्साह शिगेला; मलकापूर शहरात १५ प्रभागांमधून ३० नगरसेवकांची निवड; यंदा ‘युवा विरुद्ध जुने चेहरे’ अशी लढत रंगणार!”
नगरपालिका निवडणुकीत युवा तरुणांची लाट; ९ वर्षांनंतरच्या निवडणुकीत युवा उमेदवारांचा उत्साह शिगेला; मलकापूर शहरात १५ प्रभागांमधून ३० नगरसेवकांची निवड; यंदा ‘युवा विरुद्ध जुने चेहरे’ अशी लढत रंगणार!”
मलकापूर ( उमेश इटणारे ): तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीने संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून, यंदाची निवडणूक एक वेगळाच रंग घेणार असल्याचं चित्र दिसत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधी मुद्दा म्हणजे युवा वर्गाचा राजकारणात झालेला भव्य प्रवेश. शहरातील बहुतेक प्रभागातून तरुणांनीच निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून, संपूर्ण शहरात ‘युवा विरुद्ध जुने चेहरे’ अशी चर्चाही रंगू लागली आहे. जनता युवा वर्गांना प्राधान्य देते की जुने, अनुभवी चेहरे पुन्हा संधी मिळवतात हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. मलकापूर नगरपालिका क्षेत्रात एकूण १५ प्रभाग असून ३० नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवकांची निवड होत असते. यंदा जवळपास सर्वच प्रभागांमध्ये युवकच दावेदारी सादर करणार असल्याने लोकशाही प्रक्रियेत तरुणांची नवी उमेद दिसून येत आहे. मागील दोन कार्यकाळांमध्ये अनेक विकासकामे प्रलंबित राहिल्याने शहरातील समस्यांवर तरुणांनी थेट आवाज उठवण्याचा निर्णय घेतल्याचं स्थानिक नागरिक सांगतात. तरुण उमेदवारांमध्ये शिक्षित, व्यावसायिक, तंत्रज्ञानसाक्षर आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय युवकांची मोठ्या प्रमाणात एन्ट्री होत आहे. सोशल मीडिया मोहिमा, घराघरात थेट संवाद आणि वॉर्डनिहाय ठोस नियोजन यामुळे तरुण उमेदवारांची ताकद अधिक प्रभावी होत असल्याचं दिसत आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि क्रीडा-सांस्कृतिक सुविधा यांसारख्या प्रश्नांवर तरुणांनी नवे उपाय मांडायला सुरुवात केल्याने मतदारही या बदलत्या नेतृत्वाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच प्रभागांमध्ये बैठक, रणनीती आखणी आणि मोहीमेची सुरुवात झाली आहे. तरुणांच्या उमेदीसमोर सध्याचे विद्यमान किंवा अनुभवी माजी नगरसेवक कशी लढत देणार? लोकांचा कल कोणाकडे झुकतो? हा प्रश्न शहरभर चर्चेत आहे. नऊ वर्षांनंतरची ही निवडणूक मलकापूरच्या राजकारणाला नवे वळण देणारच, परंतु युवा नेतृत्वाची नवी पिढी शहराचा चेहरा बदलते की परंपरागत नेतृत्व राखून ठेवते? हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.