मलकापूर:- शिक्षण, संस्कार आणि बालहित यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या नूतन इंग्लिश स्कूलमध्ये आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांच्या आनंदोत्सवाने आणि विविध उपक्रमांच्या रंगतदार कार्यक्रमाने संपूर्ण शाळा परिसराला जणू बालदिनाचा सणच अवतरल्याचा भास होत होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सुरेश खर्चे सर यांच्या हस्ते चाचा नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर अमोल चोपडे सर यांनी नेहरूंच्या विचारांचा आणि कार्याचा परामर्श देत, “मुलांमध्येच देशाचे उज्ज्वल भविष्य दडलं आहे,” असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. प्रदीप कोलते सरांनी नेहरूंच्या संघर्षमय जीवनाबद्दल आणि देशासाठीच्या योगदानाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही या दिवसाचे औचित्य साधत सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीत, भाषणे आणि कविता सादर करून उपस्थितांचे मन मोहून घेतले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष खेळ व मनोरंजक उपक्रमांचे आयोजन केले होते, ज्यामुळे शाळेत दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन जनार्दन मुळे सरांनी तर मनःपूर्वक आभार प्रदर्शन मंगेश शेळके सरांनी केले. बालदिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध, आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
