मलकापूर ( उमेश ईटणारे ) : – शहराचं राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापलं आहे. नुकतीच नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच मलकापूरच्या राजकारणात नव्या उलथापालथींची चाहूल लागली आहे. दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, शहरातील प्रत्येक गल्लीपासून सोशल मीडियापर्यंत फक्त एकच चर्चा रंगली आहे यावेळी नगराध्यक्षपदावर कोणाचा झेंडा फडकणार? मलकापूरात यंदा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात वरच्या पातळीवर महायुतीची सत्ता असली तरी खाली मलकापूरमध्ये कोणासोबत कोण युती करणार आणि कोण स्वतंत्र लढणार, याकडे सर्वांचं लक्ष केंद्रीत झालं आहे. स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती सुरू असून, येत्या काही दिवसांत मोठया घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. शहरात भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणता चेहरा पुढे येतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. महायुतीकडून एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी मिळते का? की पुन्हा अनुभवी नेतृत्वावर पक्षाचा विश्वास टिकतो हे काही दिवसांत स्पष्ट होईल. दुसरीकडे काँग्रेस पक्षातही तगडी हालचाल सुरू आहे. पक्षातील अनेक इच्छुकांनी नगराध्यक्षपदासाठी रस दाखवला असून, काँग्रेसकडून कोणाला अंतिम उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, दोन्ही पक्षात बंडखोरीची शक्यताही नाकारता येत नाही. कारण अनेक इच्छुक नेते अपक्ष म्हणूनही मैदानात उतरण्याची तयारी दाखवत आहेत. अशा परिस्थितीत जर दोन्ही पक्षात बंडखोरी झाली. तर अपक्ष उमेदवारांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील नागरिक सध्या राजकारणातील या नव्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून आहेत. सोशल मीडियावरही संभाव्य उमेदवारांबद्दल चर्चा रंगत असून कोण नगराध्यक्षपदावर विराजमान होणार? हा प्रश्न शहरात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मलकापूरच्या राजकारणात यावेळी तरुण नेतृत्व, महिला प्रतिनिधित्व आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहराच्या विकासासाठी दृष्टी, अनुभव आणि जनतेशी जुळलेलं नेतृत्व कोण देणार हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
