Headlines

मलकापूरच्या तरुणीचा मुंबईत अपघात ; आयसीआयसीआय बँक मध्ये होती कार्यरत; ३ महिन्यांवरच होणारं लग्न उध्वस्त

 

मुंबई/ मलकापूर :- ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात आयसीआयसीआय बँकेत कार्यरत असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. पाठीमागून आलेल्या पाण्याच्या टॅंकरने दिलेल्या जोरदार धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, फक्त तीन महिन्यांवर असलेलं तिचं लग्न या अपघातात उध्वस्त झालं आहे.
मृत तरुणीचे नाव खुशबू दीपक परयानी (वय २७, रा. मलकापूर, जि. बुलढाणा) असे असून, ती मागील १८ महिन्यांपासून आयसीआयसीआय बँक, बीकेसी, बांद्रा (पूर्व) येथे कार्यरत होती. ती मुंबईतील खेरवाडी येथील श्रमसाधना मुलींच्या वसतिगृहात वास्तव्यास होती. तिचं १२ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्न ठरलेलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९.३० ते १०.०० दरम्यान खूशबू परयानी एशियन हार्ट हॉस्पिटल बसस्टॉप येथे उतरून ऑफिसकडे जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एमएच ४८ ए.वाय. २८७० या क्रमांकाच्या पाण्याच्या टॅंकरने तिला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ती खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवून तिला गुरुनानक हॉस्पिटल, खेरवाडी येथे दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी मृत तरुणीचा नातेवाईक बंटी सुनील डुसेजा (रा. मीरा रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीकेसी पोलिस ठाण्यात चालक ललितकुमार रामजीयान सरोज (वय ३४, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध अवधानशून्य व निष्काळजी वाहनचालना करून मृत्यू घडवून आणल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परयानी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. केवळ काही महिन्यांवर असलेले लग्नाचे स्वप्न या अपघातात चिरडले गेले असून, मलकापूर शहरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. बीकेसी पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!