मलकापूर:- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी आवश्यक अधिकार जिल्हाधिकारी डी. किरण पाटील यांना प्रदान केले असून, त्या अनुषंगाने मलकापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सविस्तर माहिती दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, मलकापूर नगरपरिषदेत एकूण १५ प्रभागांतून निवडणुका पार पडणार आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत) अशी निश्चित करण्यात आली आहे. रविवारी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल, तर मागे घेण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२५ अशी आहे.
अपील प्रक्रिया २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार असून, उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप व अंतिम यादी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल. आवश्यक असल्यास मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी व निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालयात करण्यात येईल. अंतिम निकाल १० डिसेंबर २०२५ पूर्वी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल.
या निवडणुकीसाठी एकूण ३५० अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या प्रशिक्षणासाठी १६, २२ नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी शिबिरे होणार आहेत. तसेच, ८ नोव्हेंबर रोजी विविध राजकीय पक्षांची बैठक घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण ५७,७८६ मतदार असून, त्यात २९,३२१ पुरुष, २८,४६१ महिला आणि ४ इतर मतदार आहेत. शहरात एकूण ६८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून, ईव्हीएम, वाहन व साहित्य व्यवस्था याबाबत तयारी सुरु आहे. आरक्षण रचनेनुसार अनुसूचित जाती २, नामनिर्देशित प्रवर्ग ८, सर्वसाधारण २०, यापैकी अनुसूचित जाती महिला १, नामाप्र ४, सर्वसाधारण महिला १० अशी आसनरचना निश्चित करण्यात आली आहे. उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पथके कार्यरत असून, आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जात आहे. झोनल अधिकारी प्रत्येकी ८ ते १० मतदान केंद्रांवर नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. शिंदे यांनी सांगितले की, “मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक पारदर्शक, शांततामय आणि कायदेशीर रित्या पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.”
