मलकापूर : -( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रणधुमाळीला आता वेग आला असून, शहरातील राजकीय वर्तुळात एका नव्या आणि ताज्या चेहऱ्याच्या प्रवेशाने चांगलीच चर्चा रंगली आहे. जनतेचा आवाज म्हणून ओळख असलेले, तळागाळातील समस्यांवर थेट लेखणी चालवून प्रशासनाला जागे करणारे युवा पत्रकार दीपक गणेश इटणारे यांनी प्रभाग क्रमांक १५ मधून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दीपक इटणारे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या न्यायहक्कांसाठी लढणारे नाव आहे. भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका, विकासासाठी धडपड, आणि समाजकारणाशी घट्ट नातं असलेला हा पत्रकार आता थेट जनतेचा प्रतिनिधी बनण्यासाठी रिंगणात उतरणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मी नेहमीच जनतेच्या बाजूने उभा राहिलो. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम केले. आता तीच भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून अधिक प्रभावीपणे निभावायची आहे. माझा हेतू फक्त निवडणूक जिंकणे नाही, तर प्रभाग १५ चा सर्वांगीण विकास करणे आणि प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर समाधान आणणे हे आहे. पत्रकार म्हणून त्यांनी शहरातील पाणीप्रश्न, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांवरील अनेक विषय मांडून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कामगिरीमुळे नागरिकांमध्ये ते जनतेचा पत्रकार म्हणून ओळखले जातात. स्थानिक नागरिक आणि युवक वर्गात दीपक इटणारे यांच्या उमेदवारीबद्दल उत्सुकता वाढली असून, ज्याने नेहमी आमच्यासाठी लढा दिला, आता आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू अशा प्रतिक्रिया मतदारांमधून उमटू लागल्या आहेत. राजकारणात नवा उत्साह आणि प्रामाणिकतेचा चेहरा म्हणून दीपक इटणारे यांची एन्ट्री मलकापूरच्या राजकीय पटलावर ताजी झुळूक घेऊन आली आहे.
