मोताळा/ प्रिंप्री गवळी : – शनिवार रात्री झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिंप्रीगवळीसह परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मका, सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांचे काढणीस तयार पिक पूर्णपणे वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचल्याने शेती खरडून गेली असून पिकांना कोंब फुटायला सुरुवात झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी वर्गात हताशा पसरली आहे. आधीच कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना या अतिवृष्टीने संपवून टाकले, असे गावातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नुकसान एवढे मोठे असूनही शासनाचा एकही कर्मचारी पंचनाम्यासाठी अद्याप गावात पोहोचलेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. गावातील शेतकरी गौरव उबाळे, गजानन पाटील, श्रावण उबाळे, शंकर कुंकुळे यांनी शेतात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी सुनील भामद्रे, अनिल पवार, तसेच बारसु खराटे हे उपस्थित होते. त्यांनीही परिस्थिती पाहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी आणि पुढील हंगामासाठी मोफत बियाणे व खत पुरवावे.