मलकापूर :- उमेश ईटणारे ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा) : मलकापूर शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून पोलिसांचा धाक चोरट्यांच्या मनातून पूर्णपणे गेला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आज पहाटेच अज्ञात चोरट्यांनी तब्बल तीन दुकाने फोडून रोख रक्कम आणि माल लंपास केला आहे. ही धक्कादायक घटना २७ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. माहितीनुसार शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी नंदलाल केशवजी दोषी यांच्या गड्ड्यातील दुकानाचे शटर तोडून सुमारे १५ हजार रुपयांचा डल्ला चोरट्यांनी मारला. त्याचप्रमाणे सुखकर्ता हॉस्पिटलसमोरील मेडिकलमधून पाच हजार रुपये आणि राज डेअरी डेली नीड्स (मालक निलेश अग्रवाल) यांच्या दुकानातून सहा ते सात हजार रुपयांची चोरी करण्यात आली.
सर्वात गंभीर बाब म्हणजे ही सर्व दुकाने पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. तरीही चोरट्यांनी पोलिसांना न जुमानता निर्भयपणे चोरी केली. हनुमान चौकाजवळील गड्ड्यातील दुकान हे शहरातील मुख्य व गजबजलेल्या भागात असून, या परिसरात नेहमी रात्री पोलिसांची गस्त असते. तरीदेखील चोरट्यांनी सकाळी चारच्या सुमारास ही चोरी केली. हे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच बसस्थानक परिसरात महिलांच्या पर्समधून लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. मात्र ते आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून मलकापूर पोलिस नेमकं करतंय तरी काय? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात चोरट्यांचा व्हिडिओ कैद झाला असून नागरिकांना आता पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे.
