वृत्तसेवा
अमरावतीः गुन्हा दाखल नसतानाही संशयित म्हणून ठाण्यात बोलावलेल्या शितली थापा नामक नेपाळी महिलेला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी गाडगेनगर पोलीस ठाण्यातील उपनिरिक्षक व दोन अंमलदारांना निलंबित केले. तर ठाणेदार हनमंत गिरमे यांना पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न केले.पोलीस उपनिरिक्षक मोहन केवटी, अंमलदार मोहन शर्मा व मिना मुंडाले यांचा निलंबितांमध्ये समावेश आहे. शिवरसिक नगर येथील सातपुते नामक इसमाच्या घरातून सोन्याची चेन चोरीला गेली होती. त्यांनी गाडगेनगरमध्ये तक्रार नोंदवत घरकाम करणाऱ्या थापा नामक महिलेवर संशय व्यक्त केला. त्यानुसार, गाडगेनगर पोलिसांच्या डीबीने गुन्हा दाखल न करता त्या महिलेला पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी चौकशी दरम्यान आपल्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेने सीपींकडे केलेल्या तक्रारीतून केला होता. उपायुक्त सागर पाटील यांच्याकडे ती चौकशी सोपविण्यात आली होती. त्यांच्या अहवालाअंती पोलीस आयुक्तांनी डीबीप्रमुख असलेल्या पीएसआयसह तिघांना पोलीस सेवेतून निलंबित केले.
पीएसआय, दोन पोलिस अंमलदार निलंबित, गुन्हा दाखल नसताना केली होती महिलेला मारहान
