मलकापूर : राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सर्व नागरिकांना सढळहाताने योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत इंजि. सचिन तायडे यांनी स्वतःचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीसाठी देणगी म्हणून सुपूर्द केला आहे. हा धनादेश उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या हस्ते आज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात देण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल तायडे उपस्थित होते. या प्रसंगी इंजि. तायडे यांनी सांगितले की, “आपण स्वतः ग्रामीण भागातील असल्याने शेतकऱ्यांचे कष्ट व निसर्गामुळे त्यांना होणारे नुकसान आपण बालपणापासून अनुभवले आहे. देशाचा पोशिंदा आज संकटात आहे, अशा वेळी आपण सर्वांनी मिळून त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. म्हणूनच मी माझा एक महिन्याचा पगार या निधीसाठी अर्पण केला आहे.” या वेळी एस.के. स्क्वेअर एंटरप्रायझेसच्या संचालिका व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. कोमलताई तायडे यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.