मलकापूर :- मोबाईल, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या तरुणाईसाठी संस्कृतीची जाग आणणारा भव्य कार्यक्रम म्हणजेच नवदुर्गा लेझीम महोत्सव मंडळाने आयोजित केलेली लेझीम प्रत्यक्षिक स्पर्धा! हरवलेल्या पारंपारिक खेळांना पुन्हा जिवंत करण्याचा हा उपक्रम शहराच्या मैदानावर रंगला आणि नागरिक, तरुणाई व महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभागाने त्यास प्रतिसाद दिला. ढोल-ताशांचा गजर, तालबद्ध हालचाली आणि झंकारलेली लेझीम ही दृश्ये प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ ठसलेली राहतील.
या भव्य स्पर्धेत ११ लेझीम पथकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये शहरातील गोपाळकृष्ण नगर येथील महिला लेझिम पथक, चांडक विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे लेझिम पथक, श्रीकृष्ण क्रीडा मंडळ मंगलगेट, महाराणा प्रताप क्रीडा मंडळ गाडेगाव मोहल्ला, माता महाकाली नगर मित्र मंडळ, यशवंत नगर मित्र मंडळ सावजी फैल, समर्थ रघुवीर तालीम संघ कुलमखेल, हनुमान चौक मित्र मंडळ, शिवशक्ती लेझिम पथक छ. शिवाजी नगर, लेझिम मंडळ सहभागी झाले होते. तर आयोजक असणाऱ्या नवदुर्गा लेझिम मंडळाने स्पर्धेत पारदर्शकता असावी यासाठी स्वतः स्पर्धेत भाग न घेता कुठलेही बक्षीस न घेता आपल्या उत्कृष्ट लेझिम च्या खेळाचे सादरीकरण करून उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला. महिला आणि विद्यार्थिनींनी सादर केलेले लेझिम प्रात्यक्षिके खरंच प्रशंसनीय होती, आजच्या स्पर्धेच्या युगात महिला ही पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात पुढे असू शकतात याची प्रचिती या वेळेस या दोन्ही लेझिम पथकांनी करून दिली तसेच चालू असलेल्या नवरात्राच्या देवीच्या जागरात महिलांना सादरीकरणाची संधी देऊन मंडळाने नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा एकप्रकारे सन्मानच केला. प्रत्येक पथकात ५० ते ६० खेळाडूंचा समावेश होता. सावजी फैलाच्या यशवंत लेझीम पथकाने अप्रतिम तालबद्ध सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला व ₹३१ हजारांचे पारितोषिक जिंकले. माता महाकाली नगर लेझीम मंडळाने दमदार सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला व ₹२१ हजारांचे बक्षीस मिळवले, तर महाराणा क्रीडा मंडळ गाडेगाव मोहल्ला यांनी तृतीय क्रमांक पटकावला व ₹११ हजारांचे पारितोषिक मिळवले. विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला, कार्यक्रमातील स्पर्धकांचे उत्कृष्ट सादरीकरण पाहून मैदानात उपस्थित नागरिकांचा उत्साह आकाशाला भिडला.
या उपक्रमाला यश मिळवून देण्यासाठी मा.आ. चैनसुख संचेती, भाई अशांत वानखेडे, यश संचेती, किशोर नवले, मनीष लखानी, प्रसाद जाधव, शंकर पाटील, तसेच पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पंच म्हणून 1982 सालचे एशियाड लेझीम स्पर्धेचे खेळाडू, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सदस्य दिलीप तिडके सर (अमरावती) व ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेले राजेश बोडे सर(अमरावती) कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य सुरेश लोंढे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. प्रशांत आसटकर, प्रा. धिरज वैष्णव यांनी केले, तर आभार प्रदर्शन अथर्व चिखले यांनी केले.
हा उपक्रम आमदार चैनसुख संचेती यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला. त्यांच्या प्रेरणेतून शहरातील सांस्कृतिक परंपरा उजळली असून यापुढे दरवर्षी अशा भव्य स्पर्धांचे आयोजन होईल, असा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला. आयोजक मंडळाने सहभागी पथकांचे तसेच नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
- लेझीमच्या तालावर झुलणारे खेळाडू, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर आणि विजेत्यांचा आनंदोल्हास पाहून मलकापूरात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक मेजवानी रंगली. या उपक्रमामुळे हरवलेली परंपरा नव्या जोमाने जिवंत होऊन लेझीम पुन्हा एकदा मलकापूरची शान ठरली आहे.
