मलकापूर ( दिपक इटणारे ): आषाढ संपला… भाद्रपद सुरू झाला… आणि आपल्या आराध्य दैवताचे म्हणजेच गणरायाचे आगमन होताच मलकापूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. सकाळीच शहराच्या प्रत्येक गल्लीबोळांत सजावट, रंगीबेरंगी कंदील, विद्युत रोषणाई आणि फुलांचा सुगंध दरवळू लागला होता. बाप्पाच्या स्वागतासाठी नागरिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया…’ या घुमणाऱ्या गजरात संपूर्ण शहर गजबजून गेले. प्रत्येक मंडळाच्या गणेश मूर्तीचे आगमन म्हणजे जणू भक्तांसाठी एक पर्वणीच! या क्षणी मलकापूर शहर फुलून आले होते, आनंदाश्रूंनी डोळे दिपून गेले होते आणि भक्तांच्या चेहऱ्यावर भाविकतेचे तेज झळकत होते.
सायंकाळी शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी थाटामाटात बाप्पाचे स्वागत केले. जुने गाव, मंगळगेट, माता महाकाली नगर चा राजा, कुलमखेळ चा राजा, छत्रपती शिवाजी नगर, मलकापूरचा राजा, लेवा नवयुवक चा राजा, संत ज्ञानेश्वर नगर चा राजा, रोहिदास नगर चा राजा, गाडेगाव चा राजा, यशवंत नगर चा राजा, रामवाडी चा राजा अशा मंडळांचे आगमन सोहळे पाहण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उभे होते. प्रत्येक मंडळाची मूर्ती आपल्या भव्यतेने लक्ष वेधून घेत होती. कोणत्याही कलाकाराच्या कल्पकतेला आणि भक्तिभावाला न्याय देणाऱ्या या मूर्ती पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले होते. यात विशेष लक्ष वेधून घेतले ते छत्रपती शिवाजी नगर मंडळाने उभारलेल्या ऐतिहासिक देखाव्याने. मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ३२ दातांच्या बोकड अफजलखानाचा वध केला हा ऐतिहासिक प्रसंग जिवंत करून दाखवला. महाराजांच्या पराक्रमाचा हा देखावा पाहून नागरिकांचा उत्साह द्विगुणित झाला. मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले.
सोहळ्यावेळी शहर विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. फुलांची सजावट, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांचा उत्साह पाहून असे वाटत होते की जणू स्वर्गच पृथ्वीवर उतरला आहे. प्रत्येकाच्या तोंडून सतत ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष होत होता. या जल्लोषात एक वेगळाच उत्साह होता. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. परंतु, या उत्साहात दुर्दैवाची छटा दिसून आली. काही ठिकाणी डीजेचा अतिप्रमाणात वापर करण्यात आला. डी.जे. चालकांनी मनमानी पद्धतीने १२० डेसिबलच्या वर आवाजात गाणी वाजवून कायद्याचे उल्लंघन केले. आवाज इतका कर्णकर्कश होता की अक्षरशः पोलिस कर्मचारी आणि गणरायाच्या दर्शनासाठी आलेले नागरिक कानावर बोटे ठेवून बाप्पाला प्रणाम करत होते. अनेकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. भक्तीच्या वातावरणात असा गोंगाट नको, अशी भावना नागरिकांमध्ये उमटली.
तरीदेखील शहरातील पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवली. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर, गल्लीबोळांमध्ये पोलिसांची गस्त होती. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली. त्यामुळे उत्सव कोणत्याही अडचणीशिवाय पार पडला. गणेशोत्सवाचे औचित्य साधून पुढील दहा दिवस मलकापूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ आरत्या, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहराचे वातावरण भारून जाणार आहे. नागरिकांमध्ये मात्र अपेक्षा आहे की या उत्सवाचा आनंद भक्तिभावाने साजरा व्हावा आणि कर्णकर्कश डीजेच्या आवाजाने त्यात व्यत्यय आणू नये.
मलकापूर शहरात भक्तिरसाच्या सागरात गणरायांचे आगमन! मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांनी ३२ दातांच्या बोकड अफजलखानाचा वध केल्याचा ऐतिहासिक प्रसंग जिवंत करून दाखवला!
