मलकापूर : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) शहराच्या बसस्थानकासमोर आज दि.18 रोजी सायंकाळी गौरव सावजी या मद्यधुंद इसमाने भर रस्त्यावर धिंगाणा घालत नागरिकांचा जीव मेटाकुटीला आणला. रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी आडवी लावून या व्यक्तीने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना शिवीगाळ केली तसेच एका ऑटोचालक व स्कॉर्पिओ चालकावर हल्ला करून मारहाण केली. या प्रकारामुळे रस्त्यावर अर्धा किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. शहराच्या मध्यवर्ती भागात, तेही गजबजलेल्या बसस्थानकासमोर असा उपद्रव माजवणाऱ्या या व्यक्तीविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी उपस्थित काही तरुणांनी त्या व्यक्तीस चांगलाच चोप दिला. या सर्व प्रकारामुळे एकीकडे वाहतुकीचा खोळंबा झाला, तर दुसरीकडे महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.
मलकापूर बसस्थानकासमोर गौरव सावजीने माजवली दारूची दहशत; ऑटो चालकाला व स्कार्पिओ चालकाला केली मारहाण!
