अंढेरा, मंडपगाव :- कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंडपगाव येथे घडली.
विजय उत्तम धोत्रे (४५, रा. मंडपगाव) यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. सातत्याने वाढत चाललेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे ते मानसिक तणावात होते. ७ मार्च रोजी रात्री कुटुंबातील सदस्य अंगणात झोपलेले असताना विजय धोत्रे हे घरात गेले आणि त्यांनी लोखंडी अँगलला रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतला. सकाळी पत्नी आणि आई-वडिलांनी त्यांना लटकलेल्या अवस्थेत पाहताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. शेजारी धावून आले आणि घटनेची माहिती पोलीस पाटलांना दिली. अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. करण अशोक देवकर (२०) यांच्या जबाबावरून मर्ग दाखल करण्यात आला आहे.
कर्जबाजारीपणामुळे नैराश्यात गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल, मंडपगाव येथील घटना!
