मलकापूर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नांदुरा रोडवरील पुलाजवळ १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कंटेनर आणि आयशर यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक व वाहक असे चार जण गंभीर जखमी झाले. अपघातात सुलेमान शहा (३०, रा. अजमेर), नाझीर बेग (३०, रा. अजमेर), अस्लम शहा (३५, रा. सैलानी) आणि साबीर खान (३०, रा. सैलानी) हे चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई-नागपूर महामार्ग क्रमांक ५३ वरील रेल्वे पुलावर आयशर (एमएच १५-एफव्ही ६४६०) आणि कंटेनर (आरजे ०९-जीडी १५०५) या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. पुलाजवळ सुरू असलेल्या एकतर्फी वाहतुकीमुळे चालकांचा अंदाज चुकल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना रुग्णालयात हलवले. या अपघातात मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली.
*एकतर्फी वाहतुकीचा धोका कायम*
या परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने गेल्या काही महिन्यापासून एकतर्फी वाहतूक सुरू आहे. यामुळे वारंवार अपघात होत असून, यापूर्वीही एका लक्झरी बसला अपघात झाल्याची घटना घडली होती. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.