खामगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील कंझारा येथे जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत दोघे जखमी झाले असून, परस्परविरोधी तक्रारींवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की २९ जानेवारी रोजी संतोष फकीरा शेगोकार यांनी प्रभाकर पंढरी शेगोकार यांना घराच्या बांधकामासंदर्भात विचारणा केली असता वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. संतोष शेगोकार यांनी प्रभाकर शेगोकार यांनी त्यांच्यावर बांबूच्या काठीने हल्ला करून जखमी केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, खामगाव ग्रामीण पोलिसांनी प्रभाकर शेगोकार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, प्रभाकर शेगोकार यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली असून, जुन्या नालीच्या वादातून संतोष फकीरा शेगोकार आणि राजू किसन शेगोकार यांनी संगणमत करून काठीने मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी संतोष शेगोकार आणि राजू शेगोकार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंकडून पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने पोलिस अधिक तपास करत आहेत. स्थानिक पातळीवर हा वाद चिघळू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.