मलकापूर : चाळीसबिघा परिसरातील गणेशनगरमध्ये उभारण्यात आलेल्या शांती आरोग्यम् हॉस्पीटलची इमारत अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम करण्यात आल्याने मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी संबंधितांना नोटीस बजावली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी २७ डिसेंबर रोजी न.प. मुख्याधिकारी, प्रशासक आणि तहसीलदार यांना निवेदन दिले होते. यानंतर चौकशी करण्यात आली. अहवालानुसार, हॉस्पीटलचे मालक डॉ. विकेश जैन यांनी नगरपरिषदेची परवानगी न घेता इमारत उभारल्याचे स्पष्ट झाले. नोटीसद्वारे डॉ. जैन यांना एका महिन्यात इमारत जमिनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, आदेश पाळला नाही तर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही केली जाईल, असेही कळविण्यात आले आहे. ही कारवाई शहरात चर्चेचा विषय बनली असून, नगरपरिषदेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.