चिखली (बुलढाणा): अमडापूरच्या टिपू सुलतान चौकात एका भरधाव अज्ञात वाहनाने पल्सर मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने तिघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन जण एकाच घरातील असून तिसरा त्यांचा मित्र आहे. ही दुर्दैवी घटना 13 डिसेंबर रविवारी रात्री घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले युवक हे उदयनगर येथील रहिवासी आहेत.प्रतिक संजय भुजे (25 वर्षे) प्रथमेश राजू भुजे (26 वर्षे) सौरभ विजय शर्मा (24 वर्षे) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार, हे तिघे चिखली येथे चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. परत येत असताना अमडापूरच्या टिपू सुलतान चौकात भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या पल्सर मोटारसायकलला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की गाडी पूर्णपणे चकनाचूर झाली, आणि तिघेही रस्त्यावर दूर फेकले गेले.अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील एका पंचर दुकानातील तरुणाने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना तसेच रुग्णवाहिकेला बोलावले. मात्र, तिघांना चिखली येथील रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.अमडापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार निखील निर्मळ यांनी सांगितले की, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 106(1), 281, तसेच एमव्ही अॅक्टच्या कलम 134/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातामुळे उदयनगर गावावर शोककळा पसरली आहे.