मलकापूर:- चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून लाभार्थ्यास योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस च्या मंगलाताई पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना आज दिनांक 29 मे रोजी एका निवेदनाद्वारे केली.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की 26 मे रोजी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विशेष करून घाटाखालील खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा, मोताळा येथे चक्रीवादळाने थैमान घातल्यामुळे व नंतर लगेच पाऊस आल्यामुळे यामध्ये बऱ्याच घरांचे, कार्यालयांची, शाळांचे टीन पत्रे उडून गेली नुसतीच उडाली नसून यात मानवी हानी सुद्धा झाली आहे. मलकापूर येथे भीम नगर जवळ असलेल्या महादेव मंदिराजवळचे टिनशेड कोसळल्याने रवींद्र निकम या साठ वर्षे मृत्यू झाला. शेगाव मध्ये वीज पडून वेदांत शेगोकर यांचा सुद्धा मृत्यू झाला तसेच बरेच लोक जखमी झाले. मोठे मोठे झाडे कोलमडली, विजेच्या तारा व खांब पडून वीज पुरवठा खंडित झाला, सोलर प्लॅन, छतावरील पाण्याच्या टाक्या, टपरी दुकाने सर्व उडून यावर झाडे पडून नेस्तनाबूत झाले. फोरविलर टू व्हीलर यावर झाडे पडून, पत्र पडून खूप मोठे नुकसान झाले तसेच कार्यालयाची भिंत पत्रे पडून कामगार महिला जखमी झाल्या या सर्व बाबींचा त्वरित पंचनामा करण्यात यावा तसेच सध्या शेतकऱ्यांचे कपाशी पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतातील वीज पुरवठा सुद्धा तात्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यांचे जे अतोनात नुकसान झाले आहेत यांचे सर्वे करून पंचनामे करून शेतकऱ्यांना, जखमींना, मृतकाच्या नातेवाईकांना तसेच नुकसानग्रस्तांना ताबडतोब मदत द्यावी ही प्रशासनाला महिला काँग्रेसकडून विनंती असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देते वेळी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेसच्या मंगला पाटील, पंचफुला मापारी, कल्पना पाटील, सुनंदा पवार, मनीषा अवचार, मंदाकिनी चांभारे आदी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.