मलकापूर
14/10/2024
दीडशे वर्षांच्या गुलामीचे जोखड झुगारून देण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या प्राणशक्तीला जागृत करण्यासाठी भारतभर अनेक स्फूर्तीगीते निर्माण झाली .त्यातील एक गीत म्हणजे ‘वंदे मातरम् ‘. बंकिंमचंद्र चटर्जी यांनी 1875 साली रचलेले हे गीत भारतीयांच्या मनाची प्राणशक्ती झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम् हे गीत स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना ऊर्जा देण्याचे काम करीत होते.हे शब्द वेद मंत्रांहूनही पवित्र मानून अनेक क्रांतीकारक हसत हसत फासावर गेले.
भारतीय संस्कृतीने मातृशक्तीला नेहमीच वंदन करीत मातृपूजन केले आहे. म्हणूनच जन्मदामाता या बरोबरीनेच
भूमाता ,गोमाता या संज्ञा रूढ झाल्या. वंदे मातरम् हे गीत म्हणण्यास ब्रिटिशांनी सक्त मनाई केली होती. तरीही वंदे मातरम् चा प्रभाव कमी झाला नाही. विद्यार्थ्यांनी देखील वंदे मातरम् साठी शिक्षा सहन केल्या. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीची प्राणशक्ती म्हणजे वंदे मातरम्. आजही आपल्या सर्वांना वंदे मातरम् तेवढेच प्रिय आणि वंदनीय आहे. प्रत्येक भारतीयाला प्रोत्साहित, प्रेरित करण्यासाठी वंदे मातरम् या दिव्यमंत्राची आवश्यकता आजही आहे असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या विदर्भ प्रांत बौद्धिक प्रमुख सौ आरती ताई तिवारी यांनी केले.
मलकापूर येथील राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी तथा शस्त्रपूजन उत्सवात त्या प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधुरीताई पाटील या उपस्थित होत्या. स्त्री ही अबला नसून सबला आहे . तिच्यातील सुप्त शक्ती जागृत करण्याची गरज आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ यांचे दाखले देत मातृशक्ती मध्ये एवढी शक्ती आहे की ती सर्व जगाचे कल्याण करू शकते. स्त्रियांमधील सूप्तशक्ती जागृत करण्यासाठी राष्ट्र सेविका समिति हे एक प्रभावी माध्यम आहे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात बालसेविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दंड नियुद्ध ,व्यायामयोग, ही प्रात्यक्षिके सादर केली. सह नगर कार्यवाहिका श्रीमती नयना बक्षी यांनी संचालन केले. प्रास्ताविक परिचय बौद्धिक प्रमुख सौ रुपाली शेलगेनवार यांनी केले. नगर कार्यवाहिका सौ वैशाली जोशी आणि शारीरिक प्रमुख सौ अश्विनी कुलकर्णी यांनी अतिथींचे स्वागत व सत्कार केला.
आभार प्रदर्शन नगर कार्यवाहिका वैशाली श्रीकांत जोशी यांनी केले.
अमृत वचन सौ अपर्णा एदलाबादकर, गीत सौ संगीता महाजन यांनी सादर केले. ध्वजारोहण कु.अक्षरा पारसकर हीने केले. कार्यक्रमास बहुसंख्येने माता भगिनी, बालसेविका, पालक प्रतिनिधी सौ प्रमोदिनी पाटील,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर संघचालक श्री दामोदरजी लखानी, संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सौ प्रज्ञा बक्षी यांच्या वंदे मातरम् गायनाने झाली.