सिंदखेडराजा :- तालुक्यातील दुसरबीड येथील महामार्गालगत असलेली दोन इलेक्ट्रिकल दुकाने फोडून चोरट्यांनी दोन लाख ४० हजारांचा ऐवज पळविला.
सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री महामार्गावर असलेल्या जगदंबा मशिनरी या दुकानातून विद्युत पंप, पाईप, केबल असे एकूण दोन लाख रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी पळवून नेले. तसेच शेजारीच असलेल्या गुरुकृपा मोटर रिवायडींग या दुकानातून शेतकऱ्यांचे दुरुस्तीस आलेले विद्युत पंप व भंगार असलेली तांब्याची तार असे एकूण ४० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेण्यात आला. असा एकूण दोन लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी किनगावराजा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास बीट जमादार डोईफोडे करत आहेत.महामार्गालगत असलेली ही दुकाने किनगावराजा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या दुसरबीड पोलीस चौकीसमोरच आहे. किनगावराजा पोलीस रात्रीच्या वेळी या भागात गस्तीवरही असतात. हा रस्ता वर्दळीचा असून रात्रभर वाहतूक सुरू असते. असे असतानाही चोरट्यांनी चोरी करण्याचे धाडस केले. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा धाक कमी झाली की काय, अशी व्यापारी व ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.