मेरा बु :- सततची नापीकी व कर्जबाजारी पणामुळे ५५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे २९ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील रहिवाशी असलेले रामदास आनंदा गवते वय ५५ वर्ष यांच्याकडे मंगरुळ शिवारात गट नं. ३६९ मध्ये अडीच ते तीन एकर जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी जिल्हा सहकारी बँकेकडून ६० हजार रुपये पीककर्ज घेतले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून सततची नापीकी होत असल्याने त्यांच्यावर कर्जाचा बोजा झाला होता. परंतु यावर्षी कपाशी व सोयाबिन ही दोन्हीं पिक चांगले उत्पन्न देणार या आशेपोटी त्यांनी पिकावर बँक कर्ज काढून खत औषधींचा खर्च केला होता. परंतु अचानक सोयाबिन पिकावर हुमनी अळी आणि पिवळसर रोगाने आक्रमण केले. तसेच कपाशीचे कीडरोगाने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे यावर्षीचे दोन्ही पीकाचे नुकसान झाले. आता बँकेचे कर्ज कसे फेडावे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. त्यामुळे त्यांनी रात्रीच्या वेळी घरात सर्व जण झोपलेले असताना घराच्या छतावरून जाऊन गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.घरातील कर्ता पुरुष गेल्याने पत्नी, मुले, नातेवाईक यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.