वृत्तसेवा
कारंजाः मुदत बाह्य कॅडबरी चॉकलेट खाल्ल्याने दोन मुलांना विषबाधा झाल्याचा प्रकार कारंजा तालुक्यातील वाल्हई येथे २६ सप्टेंबर रोजी उघडकीस आला. त्या संदर्भात मुलांच्या पालकाने पालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाल्हई येथील महादेव शामराव काठोळे यांनी कारंजा येथील चंदनवाडी कॉम्प्लेक्स मधील गणराज दूध डेअरी मधून कैडबरी कंपनीचा चॉकलेट बॉक्स विकत घेतला आणि त्यातील चॉकलेट खाल्यामुळे घरातील दोन मुलांना विषबाधा झाली. महादेव काठोळे यांनी २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजताचे दरम्यान कारंजा येथील चंदनवाडी कॉम्प्लेक्समधील गणराज दूध डेअरी मधून कॅटबरी कंपनीचा चॉकलेटचा बॉक्स विकत घेवून घरातील लहान मुलांना चॉकलेट खाण्यास दिले असता त्यातील दोन लहान मुलाना उलट्या व जुलाब होण्यास सुरुवात झाली. त्यांचा जीव घाबरल्यासारखा होत होता. त्यामुळे डॉक्टरांना फोन करून त्यांच्या सल्ल्यानुसार मीठ, साखर पाणी देवून प्राथमिक उपचार केला. त्यानंतर बॉक्सवरील मुदत पाहिली असता ती ३१/ ०१ / २०२४ रोजी संपलेली होती.मी लगेच तो बॉक्स घेवून दुकानदाराकडे गेलो असता त्यानी माझ्या मोबाईलच्या कॅमेरासमोर झालेली चुक अक्षरशः कबुल केली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.बेजबाबदारपणाने ही चुक करणाऱ्या व आठ महिने एक्सपायर झालेले चॉकलेटचा बॉक्स विक्रीसाठी ठेवून ग्राहकांना विकणाऱ्या दुकानदारावर योग्य ती कार्यवाही करून नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी काठोळे यांनी तक्रारीतून केली आहे.